दक्षिण पुणे भाजप जिल्हाध्यक्षपदी शेखर वढणे   

पुणे : स्थनिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या तोंडावर भारतीय जनता पक्षाने राज्यातील ९० पैकी ५८ जिल्हाध्यक्षांच्या नियुक्त्या एका फटक्यात जाहीर केल्या. मात्र, वादाच्या व चुरशीच्या २२ जिल्हाध्यक्षांच्या नेमणुका त्यांनी मागे ठेवल्या होत्या. ३१ मे त्या २२ जिल्हाध्यक्षांच्या नेमणुका जाहीर करण्यात आल्या. त्यामध्ये दक्षिण पुणे (बारामती) जिल्ह्याच्या भाजप अध्यक्षपदी सासवडचे शेखर वढणे यांची नेमणूक करण्यात आली आहे.
 
दक्षिण बारामती जिल्ह्यात दौंड, इंदापूर, बारामती, पुरंदर, भोर, वेल्हा, मुळशी या पाच विधानसभा मतदार संघाचा समावेश आहे. बारामती जिल्हाध्यक्षपदासाठी डझनभर कार्यकर्त्यांची नावे चर्चेत होती. त्यामध्ये अर्धा डझन इच्छुक पुरंदर तालुक्यातील होते. स्वत: वढणे जिल्हाध्यक्ष पदासाठी इच्छुक नव्हते. मात्र, गटातटाच्या वादात पक्षाचे नुकसान होऊ नये म्हणून ‘नवी कोरी पाटी’ म्हणून वढणे यांची नेमणूक केल्याचे सांगण्यात येते. वढणे यांनी सातारा भाजपाचे विस्तारक म्हणून यापूर्वी काम केले आहे.
 
मात्र, वढणे यांच्या नेमणुकीने पुरंदरचे माजी आमदार अशोक टेकवडे, पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष जालिंदर कामठे, जिल्हा परिषदेच्या बांधकाम आरोग्य समितीचे माजी सभापती बाबाराजे जाधवराव, जिल्हा परिषद जिल्हा दूध संघाचे माजी सदस्य गंगाराम जगदाळे, बारामतीचे शिवाजीराव मोटे, नवनात पडळकर, रंजन तावरे यांच्या समर्थकांत नाराजी पसरली आहे.

Related Articles